Archive for » 2006 «

नाताळचा उत्सव

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !
लहानपणापासून नाताळचा उत्सव म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो सजवलेला क्रिसमस ट्री, पोतडी घेतलेल सांताक्लॉज (ज्याला आम्ही लहानपणी नाताळबाबा म्हणायचो) त्याच्या हातातली बेल आणि नवजात येशूचं गोजीरवाणं रूप असलेला देखावा ! आज नाताळ म्ह्टलं की प्लम केक, एक निवांत सुट्टी आणि बेनूची क्रिसमस पार्टी याही गोष्टी यात सहभागी झाल्या. काळानुसार काही गोष्टी बदलत गेल्या, काही गोष्टींचं औत्सुक्य कमी झालं, काहींचं वाढलं परंतू दहावीच्या पुस्तकात नाताळच्या संदर्भात असलेली Little Match Girl ही Hans Christian Andersen ची अतिशय कारूण्यपूर्ण कथा मात्र प्रत्येक नाताळला आठवतेच, केवळ नाताळच्या वेळी नव्हे तर दिवाळीच्या दिवसात प्रकाशाच्या रात्री, गोडाधोडाची मेजवाणी करतानादेखील त्या कथेतील ‘लिटल मॅच गर्ल’ डोळ्यासमोर येतेच येते. त्या कथेत खरंच असं काय आहे , कोण ती मॅच गर्ल, ती कथा काय आहे सर्व तुम्हाला गुगलवर देखील मिळेल, पण ‘मॅच गर्ल’ ने मात्र मला ‘जागे’ ठेवले. नाताळ – दिवाळीच नव्हे तर इतर कोणताही उत्सव साजरा करताना, कोणतंही सेलेब्रएशन करताना मनाच्या एका कोपर्‍यात ‘लिटल मॅच गर्ल असतेच असते, परमेश्वराने आपल्याला खरंच किती सुखी ठेवलयं याची ती मला शिकवण देते अन्‌ या बद्दल मी त्याचे आभार मानतो, दिवाळिच्या ताटातून तिच्यासाठी नकळत एक करंजी बाजूला ठेवली जाते अन्‌ उरलेली करंजी …. खरंच खूप गोड असते !

अक्षरयोगिनी – नविन देवनागरी युनिकोड फॉन्ट

‘अक्षरयोगिनी’ या नावाचा युनिकोड कॉम्पॅटिबल – ओपनटाईप शैलीचा नविन देवनागरी फॉन्ट नुकताच रिलीज झाला आहे. हा फॉन्ट http://aksharyogini.sudhanwa.com/aksharyogini.html या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल.
ज्येष्ठ लेखिका आणि शास्त्रीय संगित गायिका कै.योगिनी जोगळेकर ( अर्थात अक्षरयोगिनी) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जोगळेकर कुटुम्बियांनी हा फॉन्ट ‘पब्लिक रिलिज’ केला असून फॉन्ट डिझाईन व डेव्हलपमेन्टचे काम श्री.रवी पान्डे यांनी केले आहे. आपल्या प्रिय व्यक्‍तिच्या स्मृतिप्रित्यर्थ फॉन्ट करण्याच्या जोगळेकर कुटुंबियांच्या कल्पनेला दाद द्यायला हवी !

Category: Other  2 Comments

कर्‍हेपठार अन् पुरंदर

“ उगवतीच्या उजव्या अंगाला पुण्यापासून पाच कोसावर दिव्याच्या घाटाची दरड उभी आहे. दिव्याचा घाट चढून वर गेले की, कर्‍हेच्या मुलखांत पाऊल पडते. दिव्याचा घाट म्हणजे कर्‍हेपठाराचा उंबरठाच आहे.

जेजुरीपासून वज्रगड, पुरंदर, बोपदेवघाट , दिव्याचा घाट , सोनोरीचा डोंगर, ढवळगड असा बाकदार वळसा घेऊन भुलेश्वरावर्ता सह्याद्रीने एक चंद्रकोर रेखली आहे. या डोंगरी चंद्रकोरीच्या एका टोकावर भुलेश्वर महादेव आणि दुसर्‍या टोकावर जेजुरीचा ख़ंडोबा उभा आहे अन या चंद्रकोरीच्या ऐन मध्यावरुन कर्‍हा नदी झुळूझुळू वाहते.

एकदा असें झाले, ब्रह्मदेव सह्याद्रीच्या शिखरावर ध्यानस्थ बसले होते. धर्मराजाने आरंभिलेल्या यज्ञाच्या काहीं निकडीच्या कामासाठी भीम ब्रह्मदेवांना बोलावू आला. भीम शिखर चढून वर आला. पण ब्रह्मदेवांची ब्रह्मांनंदी टाळी लागली होती भीमाने त्यांची समाधी उतरविण्यासाठी अनेकविध प्रयत्न केले; पण विधिराज काही सावध होईनात. भीम मोठ्या चिंतेत पडला. एवढ्यांत त्याला ब्रह्मदेवांच्या शेजारीच असलेला त्यांचा कमंडलू दिसला. त्यांत पाणी होते . भीमाने तो कमंडलू उचलला आणि ब्रह्मदेवाच्या मस्तकावर ओतला ! कमंडलूतले गार गार, गोड गोड आणि स्वच्छ पाणी त्यांच्या मस्तकावरून खळाळू लागले . सह्याद्रीवरून ही गंगा भुई भिजवीत, मोत्याची कणसे पिकवीत, फळाफुलांच्या बागा फुलवीत पूर्वेकडे धावत निघाली. ही खळखळणारी गंगा म्हणज़े आमची कर्‍हा नदी .ब्रह्मदेवाच्या या कमंडलूचे नाव होते ‘कर’. करांतून जी जन्मली ती ‘करजा ‘ . म्हणजे कर्‍हा. कर्‍हाबाई.

अर्थात ब्रह्मदेवहि या अकस्मिक स्नानाने खडबडून जागे झालेच ! घाई घाई ब्रह्मदेव उठले अन भीमदेवाबरोबर तसेच गेले कमंडलू सह्याद्रीवर लवंडलेला राहिला. कमंडलू खळखळ वाहतच राहिला. शतके लोटलीं. युगे लोटली अजून कर्‍हा वाहतेच आहे. अन या चंद्र्खोरी मुलखांतून कर्‍हाबाई जाते,म्हणून या पठारी मुलखाला कर्‍हेपठार म्हणतात. पुरंदर किल्ला कर्‍हेपठाराची राखण करीत उभा आहे. कर्‍हेपठारांच्या मुलखांत हा गड पुरंदर दिसतो कसा? चांदीच्या सुंदर तबकांत मोत्याचा तुरा ठेवावा तसा. अल्याड सोनोरी, पल्याड जेजुरी, मधून वाहते कर्‍हा; कर्‍हेपठारचा पुरंदर जणू शिवशाहीचा तुरा ! ”

  - बाबासाहेब पुरंदरे

 

वाचता वाचता …

मरायला माणसे मराठ्यांची चांगली. दुसर्‍यासाठी वक्‍तशीरपणे मरतात. कडक झुंजतात, अगदी कोंबड्यांसारखी जीव खाऊन ! मालकाला यश मिळवून देतात, योग्य वेळी त्याला जागेही करतात. खाण्यापिण्याचा त्रास नाही. कुठेही चार दाणे फेकले की, तेवढे टिपीत पोट भरतात. त्यांना मालकाने कापून खाल्ले तरी त्यांची तक्रार नसते, मोठे चांगले लोक ! ( हे सुलतानांनी अचूक हेरले )

- “राजा शिवछत्रपती“

बडबडगीत

खुप दिवस झाले
काही लिहीलं नाही,
खुप दिवस झाले
काही पिलं नाही,
याचा अर्थ असा नाही
की पिल्याशिवाय लिहीत नाही
असाही नाही 
की पिल्यानंतर लिहीतच नाही
लिहीणं काय किंवा पिणं काय
दोन्ही सारखंच !
जे ओरडून सांगता येतं
ते लिहीताना ‘एक्स्प्रेस’ होतं !
अन् जे सांगता येत नाही
ते पिताना !!

Category: Other  Leave a Comment