विश्वास म्हणजे नेमकं काय असतं हो? एखाद्या माणसाविषयीचा आपला निश्चित विचार, त्याला हे काम सांगितल्यावर तो हे काम करणारच अशी खात्री असणं! किंवा एखादी व्यक्ती आपल्या किंमती वस्तूंना हात लावणार नाही याची खात्री असणं। थोडक्यात, दुसऱ्याने आपल्याशी प्रामाणिकपणे वागावं ही आपली अपेक्षा असतेच! पण आपणही दुसऱ्याशी तशाच प्रामाणिकपणे, विश्वासाने वागायला पाहिजे, ही गोष्ट आपल्या लक्षात राहाते का? जाणवते का? मनापासून पटते का?
काही दिवसापूर्वी कचराकुंडीत कुणीतरी नोटांची बंडलं टाकली होती ती कुणाचीच नव्हती का? देवाने आकाशातून पाऊस पाडला होता का? पण त्यातून ते पैसे घेणाऱ्याच्या मनात क्षणभर असा विचार आला असेल का? की ही गोष्ट माझी नाही, तर मी का घ्यावी?
रस्त्यात कुणाचे पैसे किंवा पडलेली वस्तू आपल्या खिशात टाकणं योग्य आहे का? जाता जाता दुसऱ्याच्या बागेतलं फूल आपण सहज तोडून घेतो, त्या मालकाला विचारून घेतो का? ती बाग वाढवण्याच्या मागे त्या व्यक्तीचे कष्ट नसतात का? एखादं फूल तोडलं तर काय होतं, असा विचार सगळ्यांनीच केला तर त्या मालकाची बाग राहील का? दुसऱ्याच्या कष्टाचे पाच पैसे जरी आपण उचलले तरी त्या माणसाच्य मनातला विश्वास आपण कायमचा गमावून बसतो. दुसऱ्याने सांगितलेल्या कामाची चालढकल करणे, दुर्लक्ष करणे हे ही दुसऱ्याच्या मनातला विश्वास घालवण्यासारखेच आहे. मानवी स्वभावाचा हा एक बोचरा कंगोरा आहे. आपल्या कष्टाचं, आपल्या श्रमाचं साफल्य अनुभवताना जो आनंद आहे तो काही औरच आहे! माझी चोच जेवढी तेवढा चारा माझ्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेलाच आहे, हा स्वतःवरचा आणि देवावरचा विश्वास ज्यावेळी संपतो त्यावेळी दुसऱ्याच्या विश्वासाची किंमत आपल्याला रहात नाही. वस्तू चोरणे, फुकट घेणे, सांगितलेली वेळ न पाळणे, अचानक निर्णय बदलणे हे सगळे कमी अधिक, सर्व विश्वास घाताचेच क्षण आहेत.
विश्वासानंतरच आत्मीयतेचा जन्म होत असतो! आणि विश्वासावरच स्वतःचंच स्वतःशी एक छान नातं जुळत असते!
प्रसन्नतेच्या पाऊलवाटा
॥श्रीराम॥
