आता मलाही माहित नाही की मी ह्याच शब्दावर का आज उगवलो ते..
आता बारसे म्हणावे तर कोणाचेही नामकरण विधी आज नाही. तसा मी कधिही सकाळी सकाळी (मद्य) घेत नाही..
म्हणून मी बारमधून लिहितोय असेही नाही.
आमच्या लग्नाचा बार केव्हाच उडाला म्हणजे तिथेही जवळपास स्कोप नाही…
खरे तर तो डबल बार होता कारण एक तर लगीन अन् तेबी “बार” अशीच आद्याक्षरे असलेल्या आमच्या सोशीक सौंशी.
त्यामुळे एक गोष्ट मात्र सोपी झालीये ती म्हणजे दारू सोडली तरी तळीराम मित्रमंडळी जोर लावू शकली नाही. तसा मी लग्ना अगोदर सर्वत्र डंका पिटायचो की पाणीसुद्धा चढू शकते तेव्हा दारूची गरजच काय? फक्त ते लोकांना आजकाल पटू लागलेय… तेव्हाच पटले असते तर आम्हांला मुलगी पटवायची गरजच भासली नसती… पण काय म्हणतात ते… महाभयानक सत्य नुसते स्वतःला पटून चालत नाही तर इतरांनाही वळावे लागते…
म्हणजे काय की तेव्हा मी दारू पिऊन सुद्धा शुद्धीवर असलेल्या सर्वांपेक्षा जास्त दारूण सत्य बोलत असे आणि ते कोणाला पटत नसे… आणि आता दारू न पिता काहीही बरळतो तरी ते लोकांना जास्त भावते असा माझा दृढ समज होत चाललाय…
ह्याला दुसरे काय म्हणायचे हेच कळत नाही म्हणून ह्याला जीवन ऐसे नांव लिहून लेखणी टेकवितो. आता हेच खरे G1 की gone (केस) हे ज्याचे त्याने ओळखायचे… काय खायचे?
आता तरी टेकू देता का म्हटले तरी मराठी लोकं विचारतील कशाला टेकू हवाय? तर कोणी कुटे नांवाचा मराठी माणूस आज माझ्यावर का मावळताय म्हणून विचारेल ही भीती!
असे म्हणून बाळाचे नांव त्यालाच शब्द फुटल्यावर सांगू दे असे नेहमी प्रसवणारा मी सडाफटींग एक दिवस बारसे करून समक्ष चालता झालो… कारण स्वमिमांसा घडली ती अशी की, ते पठ्ठे मलाच नंतर बोलायचे की “काय बाबा (आता बाबा हे उपनाम कोणालाही लावता येते बरं का) साधे नांव ठेऊ शकला नाही मला… ठेवायचे काहितरी… घेतले असते सांभाळून.” असे वदून मला ओशाळावले असते…
तेव्हा आता घ्या सांभाळून!
