आता कोणाला कुठला ठसका लागेल काही सांगता येत नाही परंतु साधारणपणे तिखटाचा ठसका लागणे जास्त शक्य वाटते. तर त्याचे काय झाले की आजवर कधीही न लागलेला आंब्याचा ठसका लागला ही साधीच गोष्ट आमच्या चिंतनाला गती देण्यास प्राप्त झाली. २ दिवस त्यावर चिंतन घडल्यावर आज कुठे थोडासा अर्थबोध झाला तो असा…
ठसका + आम्ब्याचा = ठ.+आ. = ठा
आता ह्यानंतर साधारणतः “कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती…” वगैरे पठण करायचे असते बरं का…
आता पाहू
आम्ब्याचा ठसका = आ. ठ. = आठ
आणि ह्यानंतर मात्र ” ले ले प्यार ले ….” वगैरे गाणं बहुतेक योजावे हवे…
तर हा अगदी सोपा विषय होता पण माझ्यासारख्या बुद्दूला चिंतन घडणे म्हणजे म.हा.क.र्म.क.ठी.ण. कामच की… वो!
तर प्वायंटाचा मुद्दा असा की मी सध्या एका वेगळ्याच चिंतेच आहे… ती म्हणजे माझ्या जंगणकाला (laptop) गेले ३-४ दिवस खूप मुंग्या येऊ लागल्यात… तसे तो नेहमी स्वच्छ असतो आणि आजवर त्याच्यावर काही खाद्यपदार्थ सांडल्याचे मला ज्ञात नाही. त्यामुळे आता मला त्या मुंग्या तेथेच हळूहळू वाल्मिक (वारूळ) तयार करतात का हे कुतुहल आहे… लोकांच्या पायाला मुंग्या आल्यात अगदी डोक्याला मुंग्या आल्या वगैरे वाक्प्रचार सुद्धा माहित आहे अगदी चोटाला (पुल्लिंग) मुंग्या आल्या तरी समजू शकतो पण संगणकाला मुंग्या हे म्हणजे जरा अतीच झाले… तसेच माझा गोडेबाबा झालेला नाही किंवा हात लावीन तिथं मुंग्या म्हणायला ही काही संधी नाही. थोडेसे विषयांतर होतेय पण गोडेबाबांनी तयार केलेल्या गोड पाण्याला मुंग्या लागल्याचेही कुणी लिहून ठेवलेले नाही हे आहे वास्तव.. म्हणून सध्या मुंगी उडाली आकाशी एवढेच भजन गाऊ शकतो असे प्रामाणिकपणे वाटते…
तिकडे घरातले सर्व सध्या सुट्टीवर आहेत आणिक आम्ही एकटेच घर लढवतोय, तशातच घरी पालींचा (पालीनचा नव्हे, हो त्या सारा पालीन बाई तिकडे असतात) सुळसुळाट झालाय… आणि त्यातलीच पाल पंचमुखी मारूती रायांच्या मागे जाऊन लपल्याने आज दिली देवपुजेला जाहीर सुट्टी! म्हटले बाईंना ऊगाच तसदी नको द्यायला… तत्कारणेन आज मानसपुजा करून सर्व नित्यपठण घरभर हिंडत करून घेतले… झाले!
नाहीतरी हिंदु धर्मात जरी मूर्तीपुजा मुख्या असली तरी निर्गुण निराकार परमेश्वर साधना हाच कैवल्य प्राप्तीचा महामार्ग सांगितला आहे. आता ह्या धर्मज्ञानाच्या खिचडीत जर आमची जीभ कुठे केळ खाल्ली असेल तर ज्ञानियांची आम्हांस क्षमा असावी हीच नम्र विनंती.
क.ळा.वे.

आपण खळीने संगणकावर सजावट केली आहे काय?
खळीने सजावट वगैरे नाही पण आमच्याकडे कशालाही मुंग्या लागतात. दुध किंवा कुकरमधून काढून निवलेला भात वगैरे सुद्धा. अधुन मधून एखादी मधमाशी माझ्या शर्टावर वगैरे येऊन बसते किंवा आमच्या घरात येऊन आत्मार्पण करते… हे काही महिने चालू आहे… त्यामुळे आता मधमाशीचे आत्मार्पण हे विशेष वाटत नाही. कदाचित कालांतराने संगणकाला मुंग्या सुद्धा फारसे काही वाटणार नाही.
रामनाम अत्यंत वेगात घेतले की त्याच्या अत्यंत हळूवार आवाज हा मधमाशीच्या गुणगुणण्यासारखा येतो असे कुठेसे वाचनात आहे… पण त्याबाबतची आमची प्रगति यथातथाच आहे!