हाकेचे अंतर…

आता ह्या अनुभूतीपूर्ण लेखाचे नांव काय असावे हा प्रश्न मला तरी आजवर पहिल्यांदाच सत्य अर्थाने भेटला… ह्याला यमक म्हणावे की यमन, यमदर्शन म्हणावे की यमदृष्टांत

असो…

परवाच काही कारणाने आम्हांस सकाळच्या (पहाटे पहाटे) पारी श्री यमराजांचे त्यांच्या वहानासमवेत (म्हणजे प्रत्यक्ष यमराज रेड्यावर स्वार होऊन सरळ इकडेच येत असलेले) दर्शन (असे वाटते की आमच्याच इच्छेने) झाले (कारण आम्ही घातलेल्या अनेक घोळकरी विचार कृत्यांचा तोही “एक” भावार्थ घडत होता आणि ते स्वतःही बहुदा तो जाणत असल्याने आजही आम्ही हा लेख टंकित करायला शिल्लक आहोत ही झाली परमेश्वरी कृपा)… इतर अनेकांचे दर्शन आजवर लाभले तरीही ह्या दर्शनाने मात्र खरोखर एक वेगळेच पुण्य लाभले असे वाटते… तर हे दर्शन स्व धर्म जाणणाऱ्या व जपणाऱ्या प्रत्येकास (इच्छा असल्यास) जीवंतपणी अवश्य लाभावे असेच आम्हांस वाटते कारण त्यांचे नांवच यमधर्म असे आहे…

त्या नांवानुसार यदा यदा ही धर्मस्य… हा श्लोक तिकडेही (श्रीराम) लागू होतो असा आमचा कयास…

विनाकारण अधिक मिमांसा करण्याची सध्यातरी गरज नाही पण घडलेले टंकीत करून परमेश्वरास समर्पित केल्यावाचून आम्ही दिवस ग्राह्य धरत नाही… त्यामुळे…

तर जोपर्यंत यमराज आपले ब्रीद (आता त्यांचे ब्रीद काय हे त्यांनाच ठाऊक, आम्हांस नव्हे) सांभाळतात तोपर्यंत आपल्या जीवनांत आनंद ठासून भरलेला आहे हे मनस्वी ओळखण्याची गोष्ट आहे…

कारण समर्थ श्री रामदास स्वामी मनाच्या श्लोकातून सांगतात तसे…

जिवा कर्मयोगें जनीं जन्म झाला ।
परी शेवटीं काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥

आजवर अनेकांनी एखादी तरी ओवी अनुभवावी असे लिहिले आहे…
आम्हीही तसेच सांगतो… एखादा तरी “मनाचा श्लोक” अनुभवावा हीच परमेश्वर चरणी लीनता।

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>