Tag-Archive for » india «

प्रतिबिंब- मिसिसीपीच्या पाण्यातलं !

“भारतातला प्रत्येकजणं रोज मेडिटेशन करतो ना ?”

Hollywood Blvd, या चंदेरी दुनियेच्या राजधानीत सर्वात गजबलेल्या, मुख्य रस्त्यावर मला हा प्रश्न कोणी विचारेल असं कधीच वाटलं नव्हतं.पण ‘इजिप्शियन थिएटर’ च्या आवारात फोटो काढताना त्या अमेरिकन माणसाने विचारलाच.
या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायची मला लाज वाटत होती आणि खोटं बोलायचं नव्हतं म्हणून मी उत्तर दिलं,

“ध्यान नाही पण तत्सम नित्यपाठ मात्र प्रत्येक जण रोज करतोच”.

यानंतर त्या व्यक्‍तीने भारत आणि ‘योगा’ याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या, बोलण्याच्या ओघात त्याने आम्हाला लॉसएंजलेस मधील परमहंस योगानंदाचा आश्रम – Lake Shrine (http://www.lakeshrine.org), व तेथील महात्मा गांधींचं स्मारक हे ‘बघाच’ असं सांगितलं. दुसर्‍या दिवशी जेव्हा Lake Shrine या पवित्र स्थानाला आम्ही भेट दिली तेव्हा कळून चुकलं की काल त्याने विचारलेला प्रश्न म्हणजे एक प्रतिबिंब होतं, भारताचं योगानंदांच्या रुपात उमटलेलं ! असं, की ज्याचा अभिमान प्रत्येक भारतीय मनाला वाटावा.

दुसरा असाच किस्सा महर्षी अरविंद आश्रमात भेटलेले विन्सेन्ट पिटर्सन आणि कॅरोलिन यांचा. भारताबद्दल किती बोलू अन किती नको असं त्यांना होतं. भारतात अध्यात्मिक अभ्यास करणार्‍याल समाज मदत करतो, त्याने खाण्यापिण्याची, रहाण्याची चिंता सोडून फक्‍त meditation & spiritual study करावा, ही कल्पनाच किती महान आहे हे त्याने कित्येक वेळा बोलून दाखवलं. अमेरिकेत हे शक्य नाही, इथे प्रत्येक गोष्टिला किंमत द्यावी लागते. भारत आणि वैदिक धर्माचं या दोघांना इतकं वेडं, की यांनी भारतात आल्यावर भारतीय संस्कृतीनुसार सप्तपदी घेऊन लग्नविधी केला.

याच आश्रमात भेटलेल्या मारियाची प्रतिक्रीया मात्र तिच्या देशाच्या नावाप्रमाणे थोडी तिखटच होती. चिली देशातून ‘योगा’ शिकायला भारतात आलेली ही मुलगी. भारतात येण्यासाठी पैसे नव्हते म्हणून सहा महिने विनापरवाना युरोपमधे जाऊन नोकरी केली आणि नंतर भारतात आली. आश्रमात तिला छान वाटत होतं. पण भारत कसा वाटतोय हे जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिनं दिलेलं उत्तरं मात्र सुन्न करणारं होतं,

” तुमच्या देशामधे कधी गोरे लोक बघायला मिळतं नाहित का ?”

“मी जे कपडे घालते त्यावरून मी बाहेरच्या लोकांना प्रॉस्टिट्यूट वाटते का ? त्यांच्या नजरा आनी कमेंटस् तशा असतात.”

“रिक्षावाले अव्वाच्या सव्वा पैसे मागतात, मला कोणतीही स्कॉलरशिप मिळत नाही वा माझे पालक मला पैसे देत नाहीत, फॉरेनर्स कडून ही लुटालूट का ? तुमच्याकडे हॉस्पिटॅलिटी(आदरातिथ्य) नाही का ? तुमच्या शिक्षणात cross-cultural शिक्षण देत नाहीत का ?”,

त्यावेळी मी तिला “अरेरे, तू चुकून चुकीच्याच माणसांना भेटलीस” असं उत्तर दिलं.पण तिचे प्रश्न मात्र वास्तववादी होते, आजही मनात विचार येतो, तिच्या डायरीमधे उमटलेलं भारताचं प्रतिबिंब काय बरं असेल ?

भारताचं सर्वसामन्या अमेरिकन माणसाच्या मनात असलेलं आणखी एक प्रतिबिंब म्हणजे गांधींजी. भारत म्हणजे गांधीजींचा देश, कि जे मार्टीन ल्यूथर किंग चे आदर्श होते आणि आता अध्यक्ष असलेल्या बराक ओबामांचेही.माझ्या शालेय शिकषणात मी जे गांधीजी शिकलो ते फक्‍त भारताच्या स्वातंत्रलढ्यातील नेते होते,पण अमेरिकेतले गांधीजी म्हणजे जागतिक वर्णद्वेशाच्या लढ्याचे ‘फर्स्ट लिडर’! ज्यांनी हि ठिणगी पेटवली. हा प्रभाव इतका आहे की आमच्या देशात अजूनही वर्णद्वेश, जातिभेद आहेत हे सांगितलं तरी इथल्या लोकांना खरं वाटत नाही.

गांधीजी असो वा सोनीया गांधी, स्लम डॉग असो वा चांद्रयान विजय, तिकडची बातमी इकडे आली की तुम्हाला ओळखत असणारा अमेरीकन यावर काहीतरी विचारेलच जागा काहीहि असू शकते. अशाच माझ्या एका ड्रायविंग लेसन मधे अर्धा तास चांद्रयानाची भारतातल्या लोकांना गरज आहे का, या अमेरिकन इंस्ट्रक्टर बरोबरच्या चर्चेत गेली.

परवाचाच दुसरा एक किस्सा बफेलो-वाईल्ड-विंग मधे बसल्याबसल्या शिळोप्याच्या गप्पा सुरू झाल्या. नुकताच भारतात जाऊन आलेला माईक सांगत होता,
” डू यू क्नो सोमेश, पुण्यात कोणत्यातरी गेम्स होत्या त्याचं डेकोरेशन, त्यामुळे इतकं निट & क्लीन झालयं, तू गेल्यावर बघशीलच.यावेळी मी बघीतलं लोक ट्रॅफिक सिग्नल वगैरे पण follow करत होते, आणि गेल्या तीन वर्षात मी जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा मला more development दिसली but still need to solve traffic problems”, या माणसाला भारतातले हापूस आंबे जाम आवडतात.

या सर्वांवर कहर केला तो बाल्टिमोरच्य एका मुलीने ! तेव्हा विवेकही बरोबर होता. बाल्टिमोरमधे एका टिमबरोबर डिनरला गेलो असताना, टेबलावरच्या गप्पंमधे एका अमेरिकन मुलीने आम्हाला प्रश्न विचारला,
“डू यु क्नो स्नेक चार्मिंग ?”,

म्हणजे तु्म्हाला सापाचा खेळ करायला येतो का ?
‘स्नेक चार्मिंग’ हा भारतात शालेय अभ्यासक्रमातील विषय असावा या थाटात तिने हा प्रश्न विचारला. साप म्हटलं की ‘बाप रे बाप’ म्हणणारे आम्ही, काय उत्तर देणार ?,
थोडंसं कसंतरीही वाटलं. ती पिलेली होती असं समज़ून चाललं तरी विचारलेला प्रश्न मात्र एक प्रतिबिंब होता तिच्या मनातलं आपल्या देशाचं !

विन्स असो वा मारीया किंवा अगदी स्लमडॉग म्हणणारा रश लिबॉग, माझ्यामते या सर्वांच्या प्रतिक्रिया मला त्यांच्या मनातली प्रतिबिंब वाटतात, मला माहित आहे यातल्या कुणाही एकाच्या आवाक्यात येण्याइतका छोटा देश भारत नक्कीच नाहीये पण तरिही त्यांना जे दिसणार आहे तेच होणार त्यांच भारताविषयी प्रतिबिंब, पुढच्या पिढीसाठी.

पाणी, ते कर्‍हेचं असो की मिसिसीपीचं, तुमचं स्पष्टं प्रतिबिंब तुम्हाला दाखवणारच मग ते आवडो वा न आवडो ते तुम्हाला दिसणारच, प्रश्न उरतो आपण काय करायच ? आपल्याला इतिहास बदलता येणार नाही, मिडीयाची तोंड आवळता येणार नाहित की राजकारण्यांचा मुर्खपणा थांबवता येणार नाही, तरीही आपल्यासाठी काहीतरी उरतचं. पुन्हापुन्हा माझ्या मनात विचार येतो, आपल्याला जग दिसत नाही याचा अर्थ असा नाही की जग आपल्याला पहात नाही. होय, जग आपल्याला पहातय, नक्कीच पहातय. त्या बघण्यामधे काही काळापूर्वी कदाचित तिरस्कार होता, घृणा होती, एक third world country ही नजर होती. पण आता मात्र उत्सुकता आहे, कौतुक आहे, थोडासा संशयही !
काही नजरा आर्थिक अपेक्षेने आपल्याकडे पाहताहेत, तर काही अध्यात्मिक
…. आता आपण मात्र थोडं आरशात बघून आवरायला हवं,
स्वत:च स्वत:ला सावरायला हवं, हो ना ?

निवडणूक प्रश्न – याचे काय झाले ?

निवडणूकींच्या धामधूमीत याची कोणाला आठवण झाली का ?

* http://beta.esakal.com/2009/01/25230948/no-change-in-dorali-village.html

येथील लोक अजून जिवंत आहेत का ? असतिल तर त्यांच्या खासदार, आमदार मु.मं., पं.प्र. आदींना झोप कशी लागते ?
लागत असेल तर, कोणतीही बीअर, व्हिस्की न पिता, रात्रीअपरात्री या विषयावर चर्चा करणारे का झोपत नाहित . . .

निवडणूक प्रश्न : आरोग्यसेवा

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर परवा एका खाजगी वृत्तवाहिनीवर एक चर्चा पहायला मिळाली.वेगवेगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींना घेऊन हा कार्यक्रम सुरू होता.चर्चा सुरू असताना मधेच आरोग्यसेवेबाबत प्रश्न मांडला गेला व सत्ताधरी पक्षाच्या उमेदवाराने लगेच त्या मतदारसंघातील हॉस्पिटल्सची विस्तारयोजना त्यासाठी केलेला खर्च आदिंचा उल्लेख केला व आपल्या पक्षाने आरोग्य सेवेसाठी कायकाय केले याची माहिती दिली.आरोग्य सेवेचा प्रश्न, किमान त्या चर्चेपुरता तरी निकालात निघाला. पण ..केवळ चर्चेपुरते आणि मिडियाला दाखवण्यापुरते प्रश्न सोडवून आणि आपापल्या ‘टिऱ्या पिटून’ ते थोडीच संपतात !

भारतासारख्या देशातील आरोग्यसेवा हा प्रश्न घेतला व त्याची खरी उत्तरं शोधायची झालीच तर .. अनेक विद्वानांच्या Ph.D. त्यावर होतील आणि तरीही प्रश्न उरेलच, मग माझ्यासारख्याने त्यावर काय भाष्य करावे ? तरीसुद्धा मी आज इथे काहितरी लिहिणार आहे, हे लिहिलेलं ज्यांनी वाचावं असे कोणीच वाचणार नाहीत, म्हणून याला मी अरण्यरुदन या सदरात टाकतोय.

आरोग्यसेवेच्या प्रश्नाचे खरे उत्तर केवळ हॉस्पिटल्स बांधने किंवा असलेल्यांचा विस्तार करणे हे नक्कीच नाहिये.कारण यामधे तत्कालीन फायदा होतो तो वेगवेगळ्या कॉन्ट्रक्तर्सचा व योजना राबवणाऱ्या राजकारण्यांचा.याही पुढे जावून जमेच्या बाज़ू म्हणजे वाढीव हॉस्पिटल्मधे निर्माण झालेला रोजगार, जिथे काही मंडळींना नोकरी मिळेल. पण यातून प्रश्न सुटणार नाही हे नक्की. या प्रश्नाच्या उत्तराकडे जाताना प्रश्न काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया, ढोबळमानाने प्रश्नाचे काही भागात वर्गिकरण होईल :

१. स्थानिक अनुपलब्धता :
प्रश्नाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ‘कुशल वैद्य, आवश्यक औषधे व चिकित्सा सुविधा’ इत्यादी गोष्टींची स्थानिक अनुपलब्धता. या तिनही गोष्टी एकाच वेळी एकाच ठिकाणी केवळ शहरातील ठराविक मोठ्या हॉस्पिटल्समधे केंद्रित झालेल्या आढळतात. ग्रामिण भागामधे अथवा उपनगरीय भागांमधे या गोष्टींची कमतरता आहे.प्रश्नाच्या या भागाची उत्तरं बऱ्याच अंशी प्रश्नच्या दुसऱ्या भागात दडलेली आहेत. Market oriented किंवा व्यावसायाभिमुख होत चालेलेल्य झालेल्या समाजामधे वा शिक्षणपद्धतीमधे ‘सेवा’ करण्यासाठी वैद्यकशिक्षण घेणाऱ्यांना स्थान नाही. शिक्षण घेण्यासाठी लाखो रूपये खर्च करणाऱ्या या डॉक्टर्सना इच्छा असो वा नसो व्यावसायिकता अंगिकारावीच लागते. ( मला असं मूळीच म्हणायचं नाहिये की समाजामधे अशी सेवावृत्ती ठेऊन काम करणारे नाहियेत. आहेत ,पण सामाजिक प्रश्नाच्या अभ्यासात अपवादांची गृहितकं धरून चालत नाहित. ) भावनिक दृष्ट्या पटो वा न पटो , एक मात्र नक्की की शहरात प्रॅक्टिस करणं आणि ग्रामिण भागात प्रॅक्टिस करणं यात बाकी काहीही फरक नसला तरी मिळणाऱ्या उत्पन्नात मात्र फरक आहे !
माझा सर्व शासनकर्त्यांना किंवा इच्छूक असलेल्यांना एकच प्रश्न राहिल की आरोग्यसेवेच्या या root cause पर्यंत तुम्ही पोचला असाल तर तुमच्याकडे याचं काही solution आहे का ? मग ते solution काहिही असो. कारण जर शहरी आणि ग्रामिण वैद्यकव्यवसायातिल हि आर्थिक विषमता नाहिशी झाली तर वैद्यक व्यवसायाचे विकेंद्रीकरण होऊन अनेक आरोग्यविषयक समस्या (की ज्या तुम्हालाही माहीत नाहीत) आपोआप सुटतील.

२. आर्थिक दुर्बल्य :

पहिल्या भागात उल्लेखलेल्या सर्व गोष्टी उपलब्ध असूनदेखील योग्य तो उपचार घेण्यासाठी आर्थिक क्षमता नसणे.

खरंतरं हाच मुख्य प्रश्न समजून अनेक वर्ष शासनकर्ते सोल्यूशन देण्याचा प्रयत्न करतायेत. तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेली शासकीय रुग्णालयं हि याचा पुरावा आहेत. परंतू असलेल्या या रुग्णालयांमधेही वैद्य, औषधे आणि चिकित्सा-सुविधा यांची अनुपलब्धता दिसून येते, त्यामुळे हे नक्कीच सिद्ध झालं आहे की (कमी खर्चात वा मोफत सेवा देणारी) केवळ शासकीय रुग्णालयं बांधनं हे याचं सोल्यूशन नाही. यामधे आर्थिक क्षमता नसलेल्या रुग्णाला एकच पर्यात दिला जातो तो म्हणजे – शासकीय रुग्णालयात जाणे व तिथे असेल त्या परिस्थितीत उपचार करून घेणे. माहित असलेल्या तज्ञ डॉक्टरकडे जाण्याची मोकळीक यात नाही. याशिवाय जी चिकीत्सापद्धती तिथे उपलब्ध नाही, जी औषधे तिथे उपलब्ध नाहित त्याविषयी शासनं हमी देत नाही आणि याशिवाय तिथे योग्य उपचार मिळण्यासाठी ओळख, चिरिमिरी लागते ती वेगळीच.

इथे माझा आणखी एक प्रश्न शासनकर्त्यांना, तुमच्याकडे अशी एखादी योजना आहे का की जी आरोग्यसेवेसाठी प्रत्येकाला आर्थिक हमी देईल, मिळाली तर हा प्रश्न कायमचा निकालात लागेल आणि वरील प्रश्नही प्रशन् राहणार् अनाही. ही योजना राखताना हे भान राखायला हवं की कुणाला काही ‘फुकटं’ दिलं जाणार नाही ! कदाचित यासाठी शासनाला दूरदृष्टी ठेऊन LIC सारखी एखादी नवीन संस्था सुरू करावी लागेल. मी असं म्हणते नाहीये की यातून सर्व प्रश्न सुटतील. कदाचित काही नविन प्रश्न, नवीन घोटाळे सुरू होतील, पण कही प्रश्न तर नक्कीच मार्गी लागतील.