जून महिन्यात शाळा सुरू झाल्या-झाल्या जेव्हा आपण नवीन वही आणतो, तेव्हा त्यावर काय लिहू आणि काय नको असं होतं. लिहिताना पहिलं पान अगदी अलगद उघडतो, वहीच्या बाईंडिंगला धक्का लागू नये ही काळजी आणि पहिली ओळ लिहिताना मन अगदी फुलपाखरू झालेलं असतं
.
आज माझही अगदी तसंच झालं. दुपारी ‘बार्न आणि नोबल’ या पुस्तकांच्या दुकानात गेलो होतो. तिथं बसल्या बसल्या नोबेल विजेत्या महम्मद युनूस यांचं Creating A World Without Poverty हे पुस्तक थोडा वेळ चाळलं, सध्या स्टॅकवर असलेली पुस्तकं संपली की ते घ्यायला हरकत नाही. नंदन निलेकणींचं Imagining India ची Thomas Friedman नं लिहिलेली प्रस्तावना वाचली. भारतात गेल्यावर हे पुस्तक घ्यायचचं हे नक्की झालं.
नंतर बराच वेळ Inside Steve’s Brain वाचत बसलो. वसल्या बसल्या दोन प्रकरणं संपवली, उरलेलं पुस्तक पुढच्या भेटीत.
आणि शेवटी मोलेस्कीन जरनल !
मोलेस्कीन हा युरोपातील जवळजवळ दोनशे वर्ष जुना वह्यांचा ब्रॅन्ड. लवचिक किंवा कडक बांधनीमधे लेदरफिनिश कव्हर असलेल्या या वह्या ‘Legendary black note book’ म्हणून ओळखल्या जातात. या बऱ्याच दिवसांपासून मोलेस्कीन घ्यायचा मानस होता तो आज पूर्ण झाला. अधिक माहितीसाठी moleskine.com या वेबसाइटवर जायला हरकत नाही.
मोलेस्कीनप्रमाणेच दुसरा एक वह्यांचा ब्रॅन्ड मला आवडतो तो म्हणजे Miquelrius ! या ब्रॅन्डची एक वही मी सुमारे ३ वर्ष वापरतोय, अजुनही शाबूत आहे.
या वह्यांची बाईंडींग, शाई न फुटणाऱ्या-पानांचा दर्जा आदी गोष्टी विचारात घेतल्या तर दिर्घकालीन वापरासाठीच्या – लेखनासाठी या वह्या घ्यायला काहीच हरकत नाही.
