“भारतातला प्रत्येकजणं रोज मेडिटेशन करतो ना ?”
Hollywood Blvd, या चंदेरी दुनियेच्या राजधानीत सर्वात गजबलेल्या, मुख्य रस्त्यावर मला हा प्रश्न कोणी विचारेल असं कधीच वाटलं नव्हतं.पण ‘इजिप्शियन थिएटर’ च्या आवारात फोटो काढताना त्या अमेरिकन माणसाने विचारलाच.
या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायची मला लाज वाटत होती आणि खोटं बोलायचं नव्हतं म्हणून मी उत्तर दिलं,
“ध्यान नाही पण तत्सम नित्यपाठ मात्र प्रत्येक जण रोज करतोच”.
यानंतर त्या व्यक्तीने भारत आणि ‘योगा’ याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या, बोलण्याच्या ओघात त्याने आम्हाला लॉसएंजलेस मधील परमहंस योगानंदाचा आश्रम – Lake Shrine (http://www.lakeshrine.org), व तेथील महात्मा गांधींचं स्मारक हे ‘बघाच’ असं सांगितलं. दुसर्या दिवशी जेव्हा Lake Shrine या पवित्र स्थानाला आम्ही भेट दिली तेव्हा कळून चुकलं की काल त्याने विचारलेला प्रश्न म्हणजे एक प्रतिबिंब होतं, भारताचं योगानंदांच्या रुपात उमटलेलं ! असं, की ज्याचा अभिमान प्रत्येक भारतीय मनाला वाटावा.
दुसरा असाच किस्सा महर्षी अरविंद आश्रमात भेटलेले विन्सेन्ट पिटर्सन आणि कॅरोलिन यांचा. भारताबद्दल किती बोलू अन किती नको असं त्यांना होतं. भारतात अध्यात्मिक अभ्यास करणार्याल समाज मदत करतो, त्याने खाण्यापिण्याची, रहाण्याची चिंता सोडून फक्त meditation & spiritual study करावा, ही कल्पनाच किती महान आहे हे त्याने कित्येक वेळा बोलून दाखवलं. अमेरिकेत हे शक्य नाही, इथे प्रत्येक गोष्टिला किंमत द्यावी लागते. भारत आणि वैदिक धर्माचं या दोघांना इतकं वेडं, की यांनी भारतात आल्यावर भारतीय संस्कृतीनुसार सप्तपदी घेऊन लग्नविधी केला.
याच आश्रमात भेटलेल्या मारियाची प्रतिक्रीया मात्र तिच्या देशाच्या नावाप्रमाणे थोडी तिखटच होती. चिली देशातून ‘योगा’ शिकायला भारतात आलेली ही मुलगी. भारतात येण्यासाठी पैसे नव्हते म्हणून सहा महिने विनापरवाना युरोपमधे जाऊन नोकरी केली आणि नंतर भारतात आली. आश्रमात तिला छान वाटत होतं. पण भारत कसा वाटतोय हे जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिनं दिलेलं उत्तरं मात्र सुन्न करणारं होतं,
” तुमच्या देशामधे कधी गोरे लोक बघायला मिळतं नाहित का ?”
“मी जे कपडे घालते त्यावरून मी बाहेरच्या लोकांना प्रॉस्टिट्यूट वाटते का ? त्यांच्या नजरा आनी कमेंटस् तशा असतात.”
“रिक्षावाले अव्वाच्या सव्वा पैसे मागतात, मला कोणतीही स्कॉलरशिप मिळत नाही वा माझे पालक मला पैसे देत नाहीत, फॉरेनर्स कडून ही लुटालूट का ? तुमच्याकडे हॉस्पिटॅलिटी(आदरातिथ्य) नाही का ? तुमच्या शिक्षणात cross-cultural शिक्षण देत नाहीत का ?”,
त्यावेळी मी तिला “अरेरे, तू चुकून चुकीच्याच माणसांना भेटलीस” असं उत्तर दिलं.पण तिचे प्रश्न मात्र वास्तववादी होते, आजही मनात विचार येतो, तिच्या डायरीमधे उमटलेलं भारताचं प्रतिबिंब काय बरं असेल ?
भारताचं सर्वसामन्या अमेरिकन माणसाच्या मनात असलेलं आणखी एक प्रतिबिंब म्हणजे गांधींजी. भारत म्हणजे गांधीजींचा देश, कि जे मार्टीन ल्यूथर किंग चे आदर्श होते आणि आता अध्यक्ष असलेल्या बराक ओबामांचेही.माझ्या शालेय शिकषणात मी जे गांधीजी शिकलो ते फक्त भारताच्या स्वातंत्रलढ्यातील नेते होते,पण अमेरिकेतले गांधीजी म्हणजे जागतिक वर्णद्वेशाच्या लढ्याचे ‘फर्स्ट लिडर’! ज्यांनी हि ठिणगी पेटवली. हा प्रभाव इतका आहे की आमच्या देशात अजूनही वर्णद्वेश, जातिभेद आहेत हे सांगितलं तरी इथल्या लोकांना खरं वाटत नाही.
गांधीजी असो वा सोनीया गांधी, स्लम डॉग असो वा चांद्रयान विजय, तिकडची बातमी इकडे आली की तुम्हाला ओळखत असणारा अमेरीकन यावर काहीतरी विचारेलच जागा काहीहि असू शकते. अशाच माझ्या एका ड्रायविंग लेसन मधे अर्धा तास चांद्रयानाची भारतातल्या लोकांना गरज आहे का, या अमेरिकन इंस्ट्रक्टर बरोबरच्या चर्चेत गेली.
परवाचाच दुसरा एक किस्सा बफेलो-वाईल्ड-विंग मधे बसल्याबसल्या शिळोप्याच्या गप्पा सुरू झाल्या. नुकताच भारतात जाऊन आलेला माईक सांगत होता,
” डू यू क्नो सोमेश, पुण्यात कोणत्यातरी गेम्स होत्या त्याचं डेकोरेशन, त्यामुळे इतकं निट & क्लीन झालयं, तू गेल्यावर बघशीलच.यावेळी मी बघीतलं लोक ट्रॅफिक सिग्नल वगैरे पण follow करत होते, आणि गेल्या तीन वर्षात मी जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा मला more development दिसली but still need to solve traffic problems”, या माणसाला भारतातले हापूस आंबे जाम आवडतात.
या सर्वांवर कहर केला तो बाल्टिमोरच्य एका मुलीने ! तेव्हा विवेकही बरोबर होता. बाल्टिमोरमधे एका टिमबरोबर डिनरला गेलो असताना, टेबलावरच्या गप्पंमधे एका अमेरिकन मुलीने आम्हाला प्रश्न विचारला,
“डू यु क्नो स्नेक चार्मिंग ?”,
म्हणजे तु्म्हाला सापाचा खेळ करायला येतो का ?
‘स्नेक चार्मिंग’ हा भारतात शालेय अभ्यासक्रमातील विषय असावा या थाटात तिने हा प्रश्न विचारला. साप म्हटलं की ‘बाप रे बाप’ म्हणणारे आम्ही, काय उत्तर देणार ?,
थोडंसं कसंतरीही वाटलं. ती पिलेली होती असं समज़ून चाललं तरी विचारलेला प्रश्न मात्र एक प्रतिबिंब होता तिच्या मनातलं आपल्या देशाचं !
विन्स असो वा मारीया किंवा अगदी स्लमडॉग म्हणणारा रश लिबॉग, माझ्यामते या सर्वांच्या प्रतिक्रिया मला त्यांच्या मनातली प्रतिबिंब वाटतात, मला माहित आहे यातल्या कुणाही एकाच्या आवाक्यात येण्याइतका छोटा देश भारत नक्कीच नाहीये पण तरिही त्यांना जे दिसणार आहे तेच होणार त्यांच भारताविषयी प्रतिबिंब, पुढच्या पिढीसाठी.
पाणी, ते कर्हेचं असो की मिसिसीपीचं, तुमचं स्पष्टं प्रतिबिंब तुम्हाला दाखवणारच मग ते आवडो वा न आवडो ते तुम्हाला दिसणारच, प्रश्न उरतो आपण काय करायच ? आपल्याला इतिहास बदलता येणार नाही, मिडीयाची तोंड आवळता येणार नाहित की राजकारण्यांचा मुर्खपणा थांबवता येणार नाही, तरीही आपल्यासाठी काहीतरी उरतचं. पुन्हापुन्हा माझ्या मनात विचार येतो, आपल्याला जग दिसत नाही याचा अर्थ असा नाही की जग आपल्याला पहात नाही. होय, जग आपल्याला पहातय, नक्कीच पहातय. त्या बघण्यामधे काही काळापूर्वी कदाचित तिरस्कार होता, घृणा होती, एक third world country ही नजर होती. पण आता मात्र उत्सुकता आहे, कौतुक आहे, थोडासा संशयही !
काही नजरा आर्थिक अपेक्षेने आपल्याकडे पाहताहेत, तर काही अध्यात्मिक
…. आता आपण मात्र थोडं आरशात बघून आवरायला हवं,
स्वत:च स्वत:ला सावरायला हवं, हो ना ?

